Save Environment

पर्यावरण संवर्धन - सध्या जगाला भेडसावणारा अत्यंत कळीचा मुद्दा म्हणजे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास. या मुद्याला अनुषंगून आपण रोज अनेक चर्चा, निवेदने आणि इतर माध्यमातून होत असलेली जनजागृती पाहत असतो. समस्या कितीही मोठी असली तरी तिचे निराकरण अनेकांनी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून होत असते. हाच विचार मनाशी पक्का करून काटदरे परिवाराने पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा संकल्प केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने वृक्ष लागवड आणि संवर्धन, तसेच वन्य जीवांशी मैत्री अशी सुरुवात केलेली आहे.
चला पर्यावरण वाचवूया!
जागतिक तापमान वाढ हवामानातील बदल हा जागतिक तापमानवाढीमुळे होणारा सर्वात चिंताजनक परिणाम आहे. गेल्या काही वर्षात या बदलांचे स्वरूप स्पष्ट पणे दिसत आहे व त्याचे परिणाम अनेक देशातील लोकांनी अनुभवले आहेत. सरासरी तापमान वाढ ही केवळ २ ते ३ अंशांची दिसत असली तरी पृथ्वीवर महाकाय बदल घडवून आणण्यास सक्षम आहेत. भारतीय संस्कृती मध्ये आपण निसर्गाला देव मनात आलेले आहोत. निसर्गात उपलब्ध असलेल्या स्त्रोतांचा वापर करत असताना ज्या गोष्टी मर्यादित स्वरुपात उपलब्ध आहेत त्याचा कमीत कमी वापर करून आपण आपल्याकडून त्याची वृद्धी कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. निसर्गातील मानवी तसेच अन्य जीवांच्या गरजा पूर्ण करणारा व वातावरण संतुलांचे महत्वाचे कार्य करणारा घटक म्हणजे वृक्ष/झाडे. वृक्ष संवर्धन आज औद्योगिकीकरणामुळे आपण प्रचंड वृक्षतोड करत आहोत. त्याचे तापमानवाढी सारखे भयंकर परिणामही आपल्याला दिसू लागले आहेत. समाज माध्यमांतून या विषयाचा उहापोह सुरु झाल्यामुळे लोकांमध्ये सुद्धा जागृती दिसून येत आहे. अनेक निसर्गाशी निगडीत कार्य करणाऱ्या संस्था वृक्ष संवर्धनाचे कार्य करत आहेत. परंतू वृक्ष संवर्धनाचे कार्य हे केवळ एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे कार्य नसून ती प्रत्येक मनुष्याची जबाबदारी आहे. हे जाणून काटदरे परिवारातील प्रत्येक व्यक्तीने वर्षाकाठी किमान ५ झाडे लावणे व त्याचे योग्य रीतीने संवर्धन करणे असा संकल्प केला आहे.