People
Some best minds among Katdare family!
काटदरे परिवारात आजवर अनेक जेष्ठ श्रेष्ठ व्यक्तीमत्व झालेली आहेत, तसेच आजही अनेक लोकं आपल्या कार्याद्वारे समाजामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत. या सर्व व्यक्तींबद्दल समस्त काटदरे परिवाराला आदर आणि अभिमान आहे. तर अशाच काही मंडळींची माहिती आपण घेऊया.
कवी माधव काटदरे

कोकण भूमीवर नितांत प्रेम करणारा एक कवी, वेदकालीन संस्कृतीचे तसेच मराठय़ांच्या इतिहासातील गौरवास्पद घटनांचे दर्शन त्यांनी आपल्या कवितेमधून घडविले आहे. मूळ गावं: शीर
कवी माधव केशव काटदरे..! ८० वर्षापूर्वीच्या काळातील एक संस्मरणीय मात्र उपेक्षित असं व्यक्तिमत्त्व. कोकण भूमीवर नितांत प्रेम करणारा एक कवी, या भूमीतील रम्य निसर्गचित्रे आपल्या कवितांमधून रेखाटणारा हा कवी इतिहासातही रमला. वेदकालीन संस्कृतीचे दर्शन कवितांमधून घडविताना आणि मराठय़ांच्या इतिहासातील गौरवास्पद घटना आपल्या कवितेच्या माध्यमातून रोमारोमात निर्माण करणारा व शब्दबद्ध करणारा असा हा श्रेष्ठ कवी होता. कोकणातील गुहागर तालुक्यातील ‘शीर’ हे छोटेसे गाव कवी माधव यांचे मूळगाव. मात्र, कवी माधव यांचा जन्म ३ डिसेंबर १८९२ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथे झाला. प्राथमिक शिक्षण गुहागरमध्ये, त्यानंतर रत्नागिरी व नोकरीसाठी मुंबई आणि पुढे उत्तरायुष्य ते चिपळूणमध्ये होते. चिपळूणमध्ये त्यांचे काव्य अधिक नावारूपाला आले. १९९२ मध्ये त्यांची जन्मशताब्दी चिपळूणमध्ये पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनात साजरी झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या निवडक कवितांचा ‘माधविका’ हा संग्रह प्रकाशित झाला. येथील साहित्यिक संध्या (रेखा) देशपांडे यांनी कवी माधव यांच्या साहित्याचा चिकित्सात्मक अभ्यास करून मुंबई विद्यापीठामध्ये प्रबंध सादर केला आणि त्यामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली. यानिमित्ताने कवी माधव यांचे साहित्यविश्व उलगडले. डॉ. देशपांडे यांनी ‘कविता माधवांची- एक मूल्यमापन’ हे पुस्तकही प्रकाशित केले. त्यामुळे कोकण भूमीत दडलेला कोकणपुत्र कवी माधव अधिकच जनतेसमोर आला. कवी माधव यांचे बालपण शीर या छोट्या खेड्यातच गेले. अधूनमधून ते मलकापूरला जात असत. त्या काळी त्यांच्या कानावर स्तोत्रे, पोथी-पुराणी, कथा कानावर पडत असत. वयाच्या सातव्या वर्षी ते काही महिने मलकापूरला आजोळी गेले. या ठिकाणी त्यांनी अनेक ग्रंथवाचन सुरू केले. त्यांना तेथे चित्र काढण्याचाही छंद लागला. मात्र, आजोबांच्या विरोधामुळे चित्रकला सोडावी लागली.
सातव्या वर्षी शीर येथील पंतोजींच्या शाळेत त्यांना घालण्यात आले. शाळा लांब असल्याने जयरामपंत काटदरे यांच्याकडे त्यांची व्यवस्था करण्यात आली. तेथे स्तोत्र, श्लोक,आरत्यांचे पाठांतर झाले व गोष्टी, समर्थ रामदास, अक्कलकोट स्वामी अशी अनेक पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली आणि पाठांतरही झाली. पुढील शिक्षणासाठी त्यांना गुहागर या ठिकाणी पाठविण्यात आले. त्यांना तिसरीत शिकत असतानाच ‘कवी’ ही पदवी मिळाली. आपल्या एका मित्राने नवीन आलेला माधव कविता करतो असे गुरुजींना सांगितले आणि गुरुजींनी कवी माधव यांना एक प्रसंग सांगून कविता करावयास सांगितले. त्यानंतर मात्र कवी माधव यांनी यमक जुळवून कविता सादर करून आपली सुटका केली, असा मजेशीर प्रसंग घडला आणि ते कवी झाले. यासंदर्भातच कवी माधव यांनी आपल्या आत्मचरित्रात ‘कवी नसताना माझ्यावर अशारितीने ‘कवी’ हा छाप बसला’ असे मिश्कीलपणे लिहिले आहे. त्यांनी या काळात कथा, कादंब-या, नाटके तसेच हरिभाऊ आपटेंच्या कादंब-या वाचल्या. त्यांना वाचनाचा छंद जडला. त्यातून त्यांना देशभक्तीचे संस्कार झाले आणि आपण इंग्रजी भाषा शिकायचे असा निश्चय केला. गुहागरमध्ये मराठी शाळेत पाचवीत शिकत असतानाच १९०५मध्ये लगतच्या असगोली गावातील मुलीशी त्यांचा विवाह झाला. त्यावेळी कवी माधव १२ वर्षाचे ते पत्नी अवघी ९ वर्षाची होती. पुढे इंग्रजी शिक्षणासाठी कवी माधव गुहागर तालुक्यातील हेदवी येथे गेले. त्या ठिकाणी असलेल्या कृष्णराव जोगळेकरांनी त्यांना इंग्रजीचे धडे दिले. पुढे पत्नीलाही वाचनाचा छंद जडला व त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर तर घरातल्या घरात पत्रव्यवहारही सुरू झाला. कोणती पद्यरचना केली, श्लोक कसा करावा, कोणती पुस्तके वाचली, असा पत्रव्यवहार सुरू झाला. पुढे कवी माधव रत्नागिरी येथे इंग्रजी शिक्षणासाठी गेले. १९०८ ते १९११ या काळात कवी माधव इंग्रजी शिक्षणासाठी रत्नागिरीमध्ये राहिले. त्या काळात आधुनिक कवितेशी त्यांचा परिचय झाला. कवी केशवसूत, बालकवी, रे. टिळक, चंद्रशेखर, बी. विनायक आदी आधुनिक कवींची काव्ये त्यांनी अभ्यासली आणि त्यावेळी त्यांनी आपण कवी व्हायचे असा निश्चय केला. रत्नागिरी हायस्कूलमध्ये बदली झालेल्या शिक्षकांना निरोप समारंभ होत असे. त्यावेळी कवी माधवांनी रचलेली ‘निरोपाची पदे’ गायली जात असत. मालवण येथील कवी मिसाळ यांनी आधुनिक काळात कविता लिहाव्यात असा सल्ला दिला आणि त्यानंतर १९०८पासून त्यांनी तसा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी त्यांनी लिहिलेला ‘रत्नागिरी-किल्ला’ हा निबंध सर्वोत्कृष्ट ठरला व ते प्रसिद्धीस आले. त्यानंतर त्यांनी आपण ऐतिहासिक कविता लिहायच्या असा संकल्प केला. ‘स्कॉट’ या इंग्लिश कवीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. सुट्टीच्या दिवसांमध्ये निसर्गसौंदर्य निरीक्षणात वेळ घालवायचा हा छंददेखील त्यांनी जोपासला. त्यातून त्यांची प्रादेशिक कविता जन्मली. १९०९मध्ये त्यांनी ‘वर्गबंधू’ हे हस्तलिखित मासिक सुरू केले. त्यानिमित्ताने त्यांना गद्य-पद्य लिखाणाचा सराव झाला. कवी होण्याचा त्यांनी निश्चय केल्याने पशू-पक्षी, डोंगर-द-या, झाडे-वेली यांचे निरीक्षण ते करीत होते व शब्दसंग्रहदेखील वाढवत होते. त्यांना खेळाची विशेष रुची नव्हती. मात्र, वाचनाचा छंद होता. तेव्हा एका शिक्षकाने त्यांचा ‘वर्गातला म्हातारा’ असा उल्लेख केला. मात्र, हे त्यांना आवडले नाही. त्यावर त्यांनी गुरुजींसाठी आर्याबद्ध पत्राचा अवलंब करून आपल्या निबंधाच्या वहीत तो कागद ठेवला आणि गुरुजी वाचून थक्क झाले व चूक मान्य केली. १९११ला ते रत्नागिरी हायस्कूलमधून शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले व नोकरीसाठी मुंबईला गेले. तेथे एका इंग्रजी शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. मात्र, पगार अपुरा होता. मुख्याध्यापकांनी खासगी शिकवण्या घेण्याचा सल्ला दिला. तो त्यांना मान्य नव्हता. कारण शिकवणीमुळे वाचन-लेखनाला वेळ मिळणार नव्हता. त्यामुळे त्यांनी सरकारी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. कस्टम खात्यामध्ये नोकरी मिळवली. तीस वर्षाच्या काळात सरकारी नोकरीत असतानाही काव्यप्रतिभा फुलली. त्या काळात अनेक मराठी कवी, लेखकांची त्यांना भेट घडली. कवी माधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नी रमा यांनादेखील कविता स्फुरली. मात्र, अल्पावधीत पत्नीचे निधन झाले. त्यांचे भावविश्व उद्ध्वस्त झाले. मात्र, या सुमारास त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘धृवावरील फुले’ प्रकाशित झाला. हा काव्यसंग्रह त्यांनी आपल्या पत्नीच्या स्मृतींना अर्पण केला. तर १९१५मध्ये त्यांनी ऐतिहासिक कविता लेखनाला प्रारंभ केला. या काळात कवी अनंततनय, दिवंगत वि. ल. बर्वे (कवी आनंद), मधुसुदन हरी दामले, राम गणेश गडकरी, ग. त्र्यं. माडखोलकर, माधव ज्युलीयन आदी साहित्यिकांशी त्यांचा संबंध आला. कवी माधवांचा दुसरा काव्यसंग्रह ‘फेकलेली फुले’ (१९२०)मध्ये प्रकाशित झाला. याच काळात त्यांनी मुंबईतील नवयुग मासिकाच्या कविता विभागाचे संपादन केले. याच काळात त्यांनी इतिहास विषयक संशोधनदेखील केले. यातून इ.स. २०० ते ७०० या काळातील प्रमुख कवींवर आठ लेख, बृहत्कथेवर १६ लेख व ‘वत्सराज उदयन चरित्र’ असे ऐतिहासिक गद्यलेखन केले. इ.स. १९२२मध्ये कवी माधव यांचा दुसरा विवाह झाला. चिपळूणजवळील कान्हे येथील जठार नामक घराण्यातील कन्येशी त्यांचा विवाह झाला. यावेळी म्हणजेच १९२२ ते १९४२ या काळात कवी माधव यांच्या वाङ्मयाला ख-या अर्थाने बहर आला. पुढे १९३५मध्ये त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. मात्र, त्यांनी प्रकाशकाकडून मानधनही नाकारले. कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना ते काव्यक्षेत्रातही स्थिरावले. कोकणची ओढ मनात असल्याने आपल्या गावी असलेल्या श्रीलक्ष्मीकेशव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. ऑफिसचे काम आटोपून कोकणातून येणा-या बोटीची वाट पाहत ते भाऊच्या धक्क्यावर जाऊन थांबत व गर्दीतून येणा-या लोकांकडून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी गोळा करीत. त्या काळात त्यांनी देशभक्तीपर काव्य केले. ऐतिहासिक आणि वैदिक कवितांची निर्मिती देशभक्तीच्या प्रेरणेतून झाली. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी साहित्य संमेलनात कवी माधव यांचा गौरव केला. कवी माधव हे ऐतिहासिक कवितेचे आद्यप्रवर्तक होत असा उल्लेख केला. मात्र, त्यांना रक्तदाबाच्या दुखण्याने ग्रासले व त्यांनी सेवानिवृत्ती घेतली व पुढे १९४३मध्ये मुलांच्या शिक्षणासाठी ते चिपळूणला आले आणि स्थायिक झाले.
येथील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. कवी माधव जेव्हा चिपळुणात आले, त्यावेळी कवी आनंद चिपळुणात होते. त्यामुळे दोघांचीही मैत्री जमली. कोकणप्रेमाने हे दोन्ही कवी भारावून गेले. चिपळूण येथे प्रसिद्ध होणा-या साप्ताहिक ‘चंद्रोदय’ यामध्ये त्यांचे विविध विषयांचे लेख व कविता प्रसिद्ध झाल्या. ‘पुराणातून इतिहासात’ ही गद्यलेखमाला त्यांनी प्रसिद्ध केली. पुढे १९५०नंतर ऐतिहासिक कवितेकडे ते वळले. अपुरी राहिलेली ‘को जागर्ती’ ही कविता त्यांनी पूर्ण केली. तसेच मराठी शाहीतील अनेक व्यक्तिरेखांवर त्यांनी कविता लिहिल्या. ‘अफजलखानाचा वध’ हे खंडकाव्यही लिहिले. मराठे-इंग्रज युद्ध, यादवकाळ, गुप्तकाळ या विषयांवर कविता लिहिल्या. कोकणविषयी चित्र रंगविताना ‘हिरवे तळकोकण’ ही प्रसिद्ध कविता त्यांनी लिहिली आणि मनोमनी रुतून राहिलेली गावाविषयीची ओढ व्यक्त करण्यासाठी ‘माझा ही ओसाड पडलेला गाव’ हे खंडकाव्य लिहिले. कोकणचा प्राचिन इतिहास, येथील जनजीवन, निसर्गसौंदर्य याचे वर्णन त्यांच्या साहित्यातून होते. चिपळुणातील श्रीकृष्ण व्याख्यानमाला व इतर सार्वजनिक संस्थांतून त्यांनी व्याख्याने दिली. कवी माधव यांच्या या कार्याचा चिपळूणवासीयांनी गौरव केला. साहित्यिक दिवंगत ना. ह. आपटे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सत्कार झाला. त्या वेळी त्यांच्याविषयी खास विशेषांक निघाला. तर ‘गीतमाधव’ नावाने निवडक कवितांचा संग्रह प्रकाशित झाला. चिपळूण न. प. ने त्यांना मानपत्र देऊन गौरविले. तर येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाने तैलचित्र अनावरण करून गौरव केला. चिपळुणातील नागरिकांच्या वतीने त्यांना १००१ रुपयांचा निधी अर्पण करण्यात आला. कोकणभूमीत कवी माधवांचा हा काव्यगौरव करण्यात आला. चिपळुणात राहून कवी माधव यांनी आपल्या पत्रांच्या माध्यमातून अनेक साहित्यिक मंडळींशी संपर्क ठेवला. शिवाय चिपळुणात येणारे मान्यवर त्यांना भेटल्याशिवाय जात नसत. यामध्ये स्व. गिरीश, ना. ह. आपटे, आचार्य अत्रे, यशवंत यांचा समावेश होता. त्यांनी पत्रांद्वारे मैत्री केली. इतिहास संशोधक य. न. केळकर यांची एकदाही भेट न घेता त्यांची पत्रमैत्री होती. कवी माधव हे इतिहासात रमले. त्यांना लेखनसाह्य करणारे येथील दिवंगत गजानन फडके व हमीद दलवाई यांच्याबरोबर इतिहासावरच बोलणे होत असे. कवी माधव यांनी आपल्या कार्यकाळामध्ये कोकणच्या निसर्गाशी अतुट नाते जोडले. ते आपल्या कवितेत निर्वाणीचे निवेदन करतात.. आतां भीषण हास्य नृत्य न करी कल्लोलमालेवर, झालें वादळ शांत, शान्तचि असे गंभीर रत्नाकर; आतां शान्त; नितान्त शान्तिंत पुरें गुंगून गेलें मन, शान्ताकार अनन्त सन्निध सदा आहेच नारायण. कवी माधव यांचे साहित्य ध्रुवावरील फुले, फेकलेली फुले, कवी माधव यांची कविता, गोड गीत, गीतमाधव, माधविका. वत्सराज उदयन, परलोकचे संदेश, बालसाहित्य- पाजव्याचा पराक्रम, अंधेरी नगरीतील न्याय, तीन पढतमूर्ख, बुलबुल, उठ सोट्या तुझेच राज्य, फार फार वर्षापूर्वी, डोंगरातला काका, प-यांची देणगी, सांजवातीच्यावेळी, तिघे प्रवासी, गाढव जावई, शालिवाहनाची कथा, तीन लढाऊ प्राणी, तीन रणयोद्धे, समुद्रातील महासर्प ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांचे बालसाहित्यही विशेष उल्लेखनीय होते. ‘जांभ्या खडकावरी कालवे, त्यावरूनी खेकडे। पहात फिरती जिथे हालत्या स्वप्रतीबिंबाकडे.. तेथे होता दुस्मानाला अखंड वितरूनी भया। दर्यावर दावित दरारा विजयवंत घेरिया।।’ अशा प्रकारच्या ऐतिहासिकपूर्ण कविता त्यांनी लिहिल्या. त्यांनी इतिहास संशोधनही केले. मंडपगिरी, मो-यांची मोहना, आटपाट नगरातील कहाणी, संत तुकाराम, छोटा जलवीर, शिवराजस्तव, शिवकालीन रायगड, शाहूंचे आगमन, मस्तानी, आंग्रेकालीन विजयदुर्ग ऊर्फ घेरिया, पानिपतचा सूड, सवाई माधवरावचा मृत्यू, शाहूराजाचा उमराव (पोवाडा), तारापूरचा संग्राम, गोकलखा अशा ऐतिहासिक कविता गाजल्या. त्यांची घेरिया कविताही आंग्य्रांच्या आरमाराचे महत्त्व सांगून गेली. Source – Internet
जेष्ठ नाटककार मनोहर काटदरे

दर्जेदार विनादाने मराठी रंगभूमीवर ठसा उमटवणारे नाटककार. मूळ गावं: पिलवली
विनोदाची उत्तम जाण आणि त्याच्या दर्जाचे पक्के भान असलेले जे नाटककार मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटवून गेले त्यात मनोहर काटदरे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. मनोहर काटदरे म्हटल्यावर आठवते ते ‘आपलं बुवा असं आहे’, हे रेव्ह्यू पठडीतले अत्यंत यशस्वी ठरलेले प्रसन्न विनोदी नाटक. १९७८ साली रंगभूमीवर आलेले हे नाटक अमोल पालेकर, चित्रा पालेकर, दिलीप कुळकर्णी या त्रयीच्या अभिनयामुळे आणि दामू केंकरे यांच्या दिग्दर्शनामुळे संस्मरणीय ठरले तरी सहज सोप्या खुसखुशीत शैलीतील संवादांनी आणि कोणालाही आपल्याच घरात घडताहेत असे वाटण्याजोग्या नाट्यपूर्ण प्रसंगांनी युक्त अशी काटदरेंची संहिता हीच खरी त्याचा कणा होती. काटदरेंमधील लेखनगुणांची प्रचिती पहिल्यांदा दिली ती १९७० साली आलेल्या त्यांच्या ‘घेतलं शिंगावर’ या नाटकाने. सुलभा देशपांडे, रमाकांत देशपांडे, ललिता कामेरकर, विनायक देशपांडे असे तेव्हा हौशी-प्रायोगिक रंगभूमीवर काम करणारे कलावंत नाटकात होते. आपले हे नाटक तुफान लोकप्रिय होईल अशी तेव्हा काटदरेंनाही कल्पना नव्हती. पण या नाटकाने आश्चर्य घडवले. ते विजया मेहता माधव वाटवे प्रभृतींच्या ‘इंडियन अकॅडेमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टस्’ आणि नंतर ‘रंगायन’ या संस्थांमध्ये कार्यरत होते. त्यावेळी गो. नि. दांडेकरांच्या ‘शितू’ या नाटकात त्यांनी काम केले होते. दामू केंकरे हे त्यांचे जिवलग मित्र आणि त्यांच्या बऱ्याच नाटकांचे दिग्दर्शकही. काटदरेंनी ‘बिबी करी सलाम’, ‘माझ्या बिऱ्हाडी मी वऱ्हाडी’, ‘घोडं बघून बसा’, ‘काठोकाठ भरू द्या पेला’ अशी अनेक नाटके लिहिली. त्यातील ‘काठोकाठ भरू द्या पेला’ या नाटकावर हिंदी चित्रपट बनविण्याची त्यांनी तयारीही केली होती. ‘मंझधार’ या नावाने बनणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शक दामू केंकरेच होते. शबाना आझमी, अनंत नाग आदि कलाकारांना घेऊन चित्रपटाचे काही चित्रिकरण झालेही होते. दुर्दैवाने तो पूर्ण मात्र होऊ शकला नाही. पुढे काटदरेंनी ‘खामोशी’ या हिंदी चित्रपटावर आधारित ‘चाफा बोलेना’ हे नाटक लिहिले. त्यांच्या ‘घोडं बघून बसा’ या रेव्ह्यूचे प्रमोद पवार यांनी ‘चला जग जिंकूया!’ या नावाने प्रयोग केले. मध्यमवर्गीय मराठी मानसिकतेची नेमकी नस काटदरेंना सापडली होती. त्या भोवती ते नर्मविनोदी शैलीत घटना गुंफत. त्यातून छोटी व्यावहारिक आणि जीवनविषयक सत्ये ते दार्शनिकपणे मांडत. व. पु. काळे, शं. ना. नवरे या लेखकांच्या जातकुळीचा त्यांचा विनोद होता. तो हसवता हसवता अंतर्मुखही करे. मात्र, काटदरेंनी नाट्यलेखन विपुल प्रमाणात केले नाही, ही त्यांच्या चाहत्यांची खंतही खरीच आहे. मितभाषी, परंतु मित्रांच्या मदतीस सदैव तत्पर असलेले काटदरे त्यांच्या पहिल्या दोन नाटकांमुळे मात्र सदैव स्मरणात राहतील. Source – मटा
भाऊ काटदरे

आज अखंड महाराष्ट्राला सह्याद्री निसर्ग मित्र च्या माध्यमातून एक निसर्ग प्रेमी म्हणून परिचित. मूळ गावं: शीर
भाऊ काटदरे! आज अखंड महाराष्ट्राला सह्याद्री निसर्ग मित्र च्या माध्यमातून एक निसर्ग प्रेमी म्हणून परिचित. शीर या काटदरे परिवाराच्या मूळ गावांपैकी एक असलेल्या गावात जन्म. त्यांचं मूळ नाव श्री. विश्वास दत्तात्रय काटदरे. भाऊंना सुरुवातीपासूनच निसर्गाची आवड होती. त्यामुळे त्यांनी यात विशेष कार्य करण्याचा निर्णय घेतला. निसर्गातील दुर्मिळ प्रजाती ज्या निसर्गाचे संतुलन राखण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात अश्या प्रजातींना वाचविण्यासाठी, कायदेशीर संरक्षण मिळण्यासाठी ते कार्य करतात. दुर्मिळ वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन हे उद्दिष्ट ठेवून त्यांच्या प्रयत्नातून सह्याद्री निसर्ग मित्र (SNM) हि संस्था 1992 मध्ये चिपळूण येथे तयार झाली. महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्रामध्ये एक शक्ती बनली. महाराष्ट्रातील कोंकण या त्यांच्या कर्मभूमीमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारी जे भारतीय पाकोळी (Indian Swiftlets) या प्रजतीच्या पक्षांच्या घरट्यांची तस्करी करत असत. या घरट्यापासून सूप (soup) बनवले जाते जे पिण्यामुळे लैगिक शक्ती वाढते अशा समजामुळे या घरट्यांना परदेशात खूप मागणी असते. या तस्करीला आळा घालून त्या पक्षांची संख्या टिकून रहावी यासाठी त्यांना सुरक्षित केले. White-bellied Sea Eagles, White-rumped Vultures यांची घरटी आणि Olive Ridley जातीची कासवे विण्याची ठिकाणे भाऊ आणि त्यांचे स्वयंसेवक शोधून सुरक्षित करतात व समाजप्रबोधन करतात. भाऊ, महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत, सध्या कोकणच्या वनस्पती आणि प्राणिमात्रांचे छोटे चित्रपट ते लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. भाऊ काटदरे यांचे असे मत आहे की अशा प्रकारच्या शिक्षणामुळे वन्यजीव संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण फरक पडेल आणि त्यांनी अनेक समुदाय आणि कृती-उन्मुख कार्यक्रम सुरू केले आहेत.
मे २०१७ मध्ये पार पडलेल्या पहिल्या काटदरे संमेलनात त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व काटदरे परिवारातर्फे मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या सह्याद्री निसर्ग मित्र च्या संपूर्ण प्रवासाबद्दल त्यांची मुलाखतही घेण्यात आली. एक ते दीड तास रंगलेल्या मुलाखतीत अवधूत आणि अमोद काटदरे यांनी अनेक प्रश्न विचारून त्याचा संपूर्ण प्रवास उलगडला. या मुलाखतीचे काही क्षण आपण Youtube वर पाहू शकता. याच संमेलनात भाऊंनी काटदरे परिवाराला पर्यावरण संवर्धन आणि नेत्रदान या विषयांवर काम करण्याचा सल्ला दिला.