About Us

काटदरे घराण्याची उपलब्ध माहिती

धर्म : हिंदू जात : ब्राह्मण उपजाती : कऱ्हाडे गोत्र : जामदग्न्य प्रवर : भार्गवच्यवनाप्नवानौर्व जामदग्न्यति पंच प्रवरान्वित ऋग्वेदस्य शाकल शाखा सूत्र आश्वलायन देवता मंत्र : श्रीमहाकाली श्रीमहालक्ष्मी श्रीमहासरस्वती त्रिगुणात्मक रवळनाथ श्रीविष्णुप्रमुख पंचायतन देवता कुलस्वामिनी : कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी (अंबाबाई ) कुलस्वामी : रवळनाथ (ज्योतिबा) सर्व कऱ्हाडे ब्राह्मण हे मूळ ऋग्वेद शाकलशाखेचे देशस्थ ब्राह्मण.

पूर्वकाळी करहाटक हा स्वतंत्र प्रांत गणला जाई. यामध्ये करहाट (कऱ्हाड) व आसपासचे सुमारे ४००० ग्राम अंतर्भूत होते. करहाटक प्रांतावर शिलाहारांचे राज्य होते. नंतर त्यांना कोकणचेही राज्य मिळाले. त्या काळी कोकणचा मोठा भाग अरण्यमय होता. नैसर्गिक बंदरांजवळपांस थोडी-थोडी वसती होती. शिलाहारांचीं एक शाखा कोकणात राज्य करी. त्यांनी करहाट या मुख्य राज्यांतून मुख्यत: ब्राह्मणांना कोकणात आणिले. त्यांना निरनिराळे अधिकार देऊन गांव वसवून शेती करण्यास प्रोत्साहन दिले. करहाट (कऱ्हाड)चे आसपासहून आलेल्या या ब्राह्मणांनी आपल्याबरोबर शेतकरी आणिले व गांव वसविले. सुरवातीची काही वर्षे त्यांना शेतसारा माफ होता. गोमंतकांतील (गोव्यातील) कदंब राजानींही वर उल्लेखिलेल्या करहाटक प्रांतातून गोमंतकात ब्राह्मण आणविले. कोकणात आलेले हे ब्राह्मण कऱ्हाडजवळून आलेले म्हणून कऱ्हाडे ब्राह्मण म्हणून ओळखले जाऊ लागले. कऱ्हाडे यांची वसती सध्याच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवें या भागात झाली.

इ.स. १२२० नंतर गोव्यात आणि कोकणात देवगिरीच्या यादवांची सत्ता आली. परंतू पुढें इ.स. १३४७ मध्ये बहमनी राज्य चालू झाले. त्यामुळे गोवे आणि सिंधुदूर्ग या भागामध्ये हिंदूंना धार्मिक छळ होऊं लागला. उत्तरेकडील कोकण भागात म्हणजे सध्याच्या रत्नागिरी जिल्हयात जरी तत्वत: मुसलमानी सत्ता होती. तरी अनेक हिंदू राजेच जवळपास स्वतंत्र अंमल चालवित. त्यामुळे अनेक हिंदू कुटुंबे उत्तरेकडे पळाली. काहींनी उदरभरणार्थही स्थलांतर केले. त्यातच काटदरे यांचे पूर्वज असणार. काटदरे यांचे आधीचे उपनाम नमशे होते. तपास करतां दोन गावांमध्ये नमशे खोत वतनदार असल्याची माहिती मिळाली. एक राजापूर तालुक्यातील आडिवरे गावाजवळील नवेदर हे गांव, दुसरे राजापूर तालुक्यांतीलच शेढे हे गांव. वरील दोन गावांपैकीं शेढे या गावी एक वृद्ध नमशे व त्यांची पत्नी स्थायिक आहेत. तर नवेदर या गांवी स्थायिक नमशे नाहीत. नवेदर या गांवी नमशाची जागा या नावाने ओळखली जाणारी घरवंद व परसू अशी पडीक जागा आहे. नमशे जमीन विकून काही अन्य व्यवस्था करुन नोकरी निमित्त बाहेर पडले. श्री. जोशी नावाचे गृहस्थ काही इस्टेट सांभाळतात. शेढें या गांवचे नमशे जमीन-दस्त भरायला पैसे नाहीत म्हणून रातोरात पळाले. सुमारे शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यांजपैकी श्री दत्तात्रेय बळीराम नमसे (ते आता नमसे असे उपनाम लावितात), हे मु. कासार्डे, ता. कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथे रहातात. अन्य कोणा नमशे यांची माहिती उपरोक्त नमसें यांजकडून अगर अन्य कोणाकडून मिळू शकली नाही. काटदरे यांचे मूळ गांव नवेदर की शेढें हे नक्की सांगणे कठीण आहे. एवढी नक्की माहिती आता मिळणेही कठीण आहे.

मी माझ्या वयामुळे प्रत्यक्ष भेट देऊ शकलो नाही. काटदरे यांचा जो देवतामंत्र त्यातील देवतांची मंदिरे आडिवरे या गांवी जवळ-जवळच आहेत. नवेदर हा काटदरे यांचा मूळ गांव असण्याची शक्यता आहे. काटदरे हे उपनाम कसे या विषयी नक्की माहिती उपलब्ध नाही. नदी काठाला धरुन राहिल्यामुळे काठधरे > कांटधरे > काटदरे असे नाव झाले असा समज आहे. परंतू नदीचा काठ धरुन कोठे रहात होते या विषयी नक्की माहिती नाही. शीर व जवळपासचे वतन काटदरे यांचे पूर्वी खेम सावंत यांजकडे होते. त्यांचा गुटे तर्फ वलांबे (गुढे तर्फ वेळंब) येथील लढाईत निर्वंश झाला. काटदरे यांना मिळालेल्या वतनामध्ये कुटगिरी या गांवाचाही समावेश होता. शीरचे वतन मिळाले तरी आधीचे वतनदार सावंत यांची बायकामंडळी शींर येथेच असल्यामुळे काटदरे कुंटगिरी या गांवी काही वर्षे राहिले होते. पुढें कुंटगिरी हा गांव काटदरे यांजकडून काढून तत्कालिन राज्यकर्त्यांनी खेतले यांना दिला. परंतू तत्पूर्वीच काटदरे शीर येथे रहावयास आले की, नंतर शीर येथे रहावयाला आले कल्पना नाही. शीरचे वतन काटदरे यांना मिळाल्यानंतर काटदरे यांनी आपले मूळ भाईबंद असलेले आचार्य यांना आपले कुलोपाध्याय म्हणून इकडे आणिले होते. आचार्य हे मूळ नमशे परंतू ते याज्ञिकी शिकून आचार्य झालेले होते. सुमारे ३० वर्षांपूर्वी मी कुटगिरी गांवी गेलो असतां नदीचे काठाजवळ एक घरवंद पाहिला अन्य वस्ती जरा दूर पाण्याची सोय चांगली आहे. मी चौकशी केली. घरवंद ब्राह्मणाचा आहे असें समजले. कुटगिरी येथें ब्राह्मण वस्ती नाही. एवढी जुनी माहितीआता मिळणे शक्य नाही. परंतु माझा तर्क आहे की, काटदरे येथें रहात असावेत.

शीर येथून भिक्षुकीसाठीं वृत्तीचा गांव म्हणून शीर येथून गेलेले आचार्यही काही वर्षे कुंटगिरी येथे रहात होते. परंतू, भालेराई (भालेराई म्हणजे धामधुम) मूळे कुटगिरी गांव उजाड पडला अशी माहिती मुर्तवडे येथे सांपडलेल्या आचार्य यांच्या वृत्तीच्या व्यवस्थे संबंधीच्या जुन्या कागदात आहे. माझे चुलते कै.ती. माधव केशव काटदरे याचे काही काही कागदपत्रे शीर येथे होती. त्यावरुन सन १९३३ साली वंशावळी तयार केली. खेरीज अन्यही माहिती मिळविली. त्यानुसार कृष्णाजी हा शीर येथील काटदरे घराण्याचा ज्ञात मूळपूरुष. कृष्णाजी यांचे पूर्वीची फारशी काही लेखी माहिती उपलब्ध नाही. कृष्णाजी यांचा काल साधारण सन १७०० पासून पुढें असावा. कारण, कृष्णाजी यांचा नातू ऋद्राजी सन १७९४ साली पुणे येथे, कोतळूक गांवातील वतनासंबंधीच्या साने-विरुध्द-ओक यांचे तंट्यात नाना फडणवीस यांचेपुढे साने यांचे बजूने साक्ष देण्यासाठी गेलेला होता. त्यावेळी ऋद्राजी ५० वर्षांचा होता. मूळपुरुष कृष्णाजी यांजपासून माझी ९ वी पिढी येते. कळंबट, वहाळ, मुर्तवडे वगैरे गांवी काटदरे कृष्णाजी यांचे पूर्वीच गेलेले आहेत. वहाळ व कळंबट येथील वंशावळ्या दोन-दोन पिढ्यांनी जुन्या आहेत.

संकलक आणि लेखनिक :- दत्तात्रय गंगाधर काटदरे, वय ७५ मु.पो.शीर, ता.गुहागर, जि.रत्नागिरी. श्री गौरीपूजन भाद्रपद शु. ८ शके १९२२, ६ सप्टेंबर २०००