Eye Donation
नेत्रदान - देशभरातील अंध बांधवांच्या जगण्यात प्रकाश फुलविण्यासाठी काटदरे परिवाराने केलेला निश्चय. प्रत्येक काटदरे मनुष्य मरणोत्तर नेत्रदान करेलच हे ध्येय्य आणि ते प्रत्यक्ष अमलात आणण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे.

सह्याद्री निसर्ग मित्र हि गेली २२ वर्ष निसर्ग संवधर्न क्षेत्रात काम करीत आहे. त्याच बरोबर या २०१५ पासुन संस्थेने वैद्यकिय क्षेत्रात काम करण्य़ास सुरुवात केली आहे. त्यामध्ये रक्तदान, देहदान, नेत्रदान अशी काम चालु आहेत. या संस्थेच्या सहाय्याने काटदरे परिवारातील अनेक सदस्यांनी नेत्रदान संकल्पपत्रे भरली आहेत. आपणही असा संकल्प करू इच्छित असाल तर खाली दिलेल्या फॉर्म मध्ये आपली माहिती भरून पाठवा. आमचे प्रतिनिधी आपल्याशी लवकरच संपर्क साधतील. नेत्रदान म्हटलं कि प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यातल्या काही प्रश्नाचं आपण निराकरण करूया. नेत्रदान म्हणजे नक्की काय असते? नेत्रदान म्हणजे केवळ डोळ्यांच्या आत ०.५ मि.मी इतका पातळ असलेला डोळ्याचा कॉर्निया काढणे. ही प्रक्रिया निधनानंतर ६ तासांच्या आत होणे अत्यंत आवश्यक आहे. नेत्रदानामध्ये संपूर्ण डोळा काढला जात नाही. नेत्रपेढी म्हणजे काय असते? नेत्रपेढीचे काम कॉर्नियाचा संग्रह करणे, त्यांचे योग्यरित्या संरक्षण करणे, त्यांचे अंध व्यक्तींना नेत्र शस्त्रक्रियेसाठी वाटप करणे आणि लोकांना नेत्रदानासाठी उद्युक्त करणे असे आहे. यासठी नेत्रपेढीला कोणताच नफा होत नाही. महाराष्ट्रात मे २०१५ अखेर, अश्या एकूण ३०९ नेत्रपेढ्या आहेत.
नेत्रदानानंतर काय होते?
मृत व्यक्तीचा कॉर्नियाचा एम-के मिडीयम मध्ये संचय करण्यात येतो. त्यानंतर त्याचे ७२ तासांच्या आत शास्त्रक्रियेमार्फात अंध व्यक्तीमध्ये प्रत्यारोपण करण्यात येते. नेत्रपेढीकडून नेत्रदात्याच्या नातेवाईकांना दोन पात्र अंध व्यक्तींची नावे कळविण्यात येतात. मृत व्यक्तीला एच.आय.व्ही आणि कावीळ (हिपेटायटिस) नव्हता याची खात्री झाल्यावरच पुढील प्रक्रिया केली जाते. या कॉर्नियाची कुठे विक्री केली जाते का? हा कॉर्निया कुठेही विकला जात नाही. ज्या अंध व्यक्तीला दृष्टी मिळते त्यालादेखील कॉर्नियासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत. त्याला केवळ हॉस्पिटलचा व औषधांचा खर्च स्वतः करावा लागतो. नेत्रदात्याच्या नातेवाईकांना शास्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी नेत्र-प्रत्यारोपणाची माहिती कळविली जाते.
नेत्रदानाची प्रक्रिया घरी होऊ शकते का?
ही प्रक्रिया मृत शरीर जेथे आहे तेथे करता येते. यासठी घरून हॉस्पिटलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. कसे करतात नेत्रदान? नेत्रदान म्हणजे केवळ डोळ्यांच्या आत ०.५ मि.मी इतका पातळ असलेला डोळ्याचा कॉर्निया काढण्यात येतो. ही प्रक्रिया निधनानंतर ६ तासांच्या आत होणे अत्यंत आवश्यक आहे. मृत व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला नसला तरीपण त्यांचे नेत्रदान करता येऊ शकते. यासाठीचा निर्णय मृत व्यक्तीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने घ्यावा. ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वकरित्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत केली जाते. यामुळे मृत व्यक्तीचा चेहरा अजिबात विद्रूप होत नाही.
तुमच्या प्रियजनांचे नेत्रदान करायचे असल्यास हे नक्की करा! सह्याद्री निसर्ग मित्र अथवा त्यांच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधा. संपर्कासाठीचा दूरध्वनी क्र. ९३७३६१०८१७ (श्री. भाऊ काटदरे) किंवा ९८८१५७५०३३ (श्री. उदय पंडित) असे आहेत. सह्याद्रीचे स्वयंसेवक व संबंधित डॉक्टर तासाभरात तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी पोहोचतील. स्वयंसेवक अथवा डॉक्टर येईपर्यंत निधन झालेल्या व्यक्तीचे डोळे मिटून ठेवावे. तसेच डोळ्यांवर ओल्या कापसाचा बोळा ठेवावा. मृत व्यक्तीला पंख्याच्या वाऱ्यापासून शक्य तितके लांब ठेवावे. मरण पावलेल्या व्यक्तीचे डोके शक्यतो उशीवर ठेवावे. नेत्रदानानंतर डोळ्याचा कॉर्निया रक्षण व पोषणासाठी एम-के मिडीयममध्ये ठेवला जातो. त्यानंतर तो सांगली येथील दृष्टीदान नेत्रपेढीमध्ये सुपूर्द करण्यात येतो. नेत्र पेढीकडून तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी फोन करण्यात येईल व नेत्रदानाचे प्रमाणपत्र एका आठवड्यात मिळू शकेल. नेत्रपेढी त्यांच्याकडील यादीत असलेल्या अंध व्यक्तींना शास्त्रक्रियेसाठी सूचित करते. त्यानंतर लवकरच नेत्र पेढीकडून तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीचे डोळे अंध लोकांना शास्त्रक्रियेमार्फत प्रत्यारोपित करण्यात आल्याचा निरोप येईल.